नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध ‘अक्षरसुलेखनकार’ कमल शेडगे यांचं आज मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 1962 मधे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा ‘लेटरिंग’ केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच गं घुमा, ज्वालामुखी, गुलमोहर अशी हजारांहून अधिक नाटके रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमल शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता.
फिल्मफेअर आणि माधुरी या मासिकांसाठी त्यांनी ‘लेटरिंग’ केलं होतं. नाटकाच्या व्यतिरिक्तही शेडगे यांनी महाराष्ट्र टाइम्स(जुना) आणि सामना वर्तमानपत्रांचं, अक्षर, चंदेरी, षटकार या नियतकालिकांचं, कथाश्री, दीपलक्ष्मी या अंकांचं सुलेखन केलं आहे.
तब्बल 55 वर्षे अक्षरांच्या दुनियेत मुशाफिरी करणारे कमल शेडगे हे शेवटच्या दिवसापर्यंत कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कालही त्यांनी एका पुस्तकाचे लेटरिंग केले होते. कमलाक्षरं आणि चित्राक्षरं ही त्यांची पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत.