यवतमाळ येथे साकारण्यात आलेल्या दहा हेक्टर रोपवनाचा वनमंत्री संजय राठोड व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : राष्ट्रीय वन नीती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के एवढे क्षेत्र वनाच्छादनाखाली असणे आवश्यक आहे. वनांतर्गत असलेले क्षेत्र हे जैवविविधतेने लाभलेले असून त्याची जोपासना करण्यासाठी वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत त्रिपक्षीय करार करून वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले. यवतमाळ वनविभाग, प्रयास संस्था व दिलासा संस्था, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे साकारण्यात आलेल्या दहा हेक्टर रोपवनाचा शुभारंभ वनमंत्री संजय राठोड व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. त्यावेळी श्री.राठोड बोलत होते.
अशासकीय संस्था आणि खाजगी क्षेत्रामार्फत वनखात्याच्या जमिनीवर त्रिपक्षीय करारनामा करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याच्या धोरणानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिलासा संस्थेच्या सहकार्याने व वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रयास संस्थेने सदर प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षांमधील राज्यस्तरावरील हा पहिलाच मंजूर प्रस्ताव आहे. यापूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संस्थेनेही अशा प्रकारचा उपक्रम अतिशय चांगल्या रीतीने राबविला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल, असा विश्वास वनमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कृषिमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, अशाप्रकारे स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने यवतमाळ जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण व चांगला उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक पर्यावरणप्रेमी व्यक्तीने यामध्ये आपला सहभाग नोंदविला पाहिजे. अशा प्रकारचे उपक्रम इतर जिल्ह्यांमध्येही आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा कृषीमंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, प्रयास व दिलासा या स्वयंसेवी संस्थांचे सभासद उपस्थित होते.
तत्पूर्वी कृषिमंत्री दादाजी भुसे व वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथील ऑक्सीजन पार्क मध्ये वृक्षारोपण करून वन महोत्सव 2020 साजरा केला.