सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रालयीन कामकाजाचा घेतला आढावा
मुंबई : कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज मंत्रालयात कामावर परत रुजू झाले. मंत्रालयातील त्यांच्या दालनात परतताच त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
श्री. मुंडे दर महिन्याला विभागामार्फत, पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात तसेच त्यांच्या परळी या मतदारसंघात केलेल्या कामकाजाचा आढावा पक्षश्रेष्ठी व जनतेसमोर मांडतात. रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत असताना देखील त्यांनी ही परंपरा कायम राखत आपला कार्य अहवाल थेट रुग्णालयातून सादर केला होता.
तसेच होम क्वारंटाईन असताना त्यांनी घरून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रिमंडळ बैठकीतही हजेरी लावली होती. सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी यांच्याही ते सातत्याने संपर्कात होते.
दरम्यान आज श्री. मुंडे यांनी मंत्रालयात उपस्थित राहून विभागाचे सचिव पराग जैन, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी विविध माध्यमातून चर्चा करत कामकाजाचा आढावा घेतला.