नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उत्तम तब्येतीसाठी योग यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु होईल.

आयुष राज्य मंत्री किरेन रिजीजु देखील यावेळी भाषण करतील, तर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील. देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही उद्या योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे.

लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून व्यायाम आणि योग करायला चालना देणं, हे या आयोजनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४५ मिनिटांच्या एकत्रित योग कार्यक्रमात भाग घ्यावं असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. त्यादृष्टीनं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आयोगानं सूचना जारी केल्या आहेत.

जागतिक योग दिना निमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाईल. या उपक्रमांतर्गत नांदेडच्या मुख्य टपाल घरांमध्ये नोंदणी केलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालांवर ही विशेष रद्दीकरण मोहर छापण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड विभागाच्या टपाल अधिक्षकांनी दिली आहे.

योग दिनाच्या निमीत्तानं मुंबईत, मुंबई सेंट्रल इथल्या वॉकहार्ट रुग्णालयात आज योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यात रुग्णालयातले डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

उद्याच्या योग दिनाविषया जनजागृती करण्यासाठी औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाणदेखील यावेळी उपस्थित होते