नवी दिल्ली : प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेंतर्गत देशभरात एकूण 5440 दुकाने कार्यरत असून त्यामधून लोकांना परवडण्याजोग्या दरात औषधांची विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 840 दुकाने असून त्याखालोखाल तमिळनाडूत 539 आणि कर्नाटकमध्ये 524 दुकाने आहेत. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत जेनेरिक औषधे या प्रकाराची कोणतीही व्याख्या नमूद केलेली नाही. मात्र, जेनेरिक औषधे म्हणजे एखाद्या ब्रँडेड औषधात जे घटक असतात तेच घटक त्याच स्वरुपात आणि मात्रेमध्ये तितक्याच प्रभावी पद्धतीने कार्य करणारी औषधे असतात. त्यांची किंमत ब्रँडेड औषधांच्या तुलनेत खूपच कमी असते.

वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना उपचाराच्या वेळी अशा प्रकारची औषधे सुचवावीत असा नियम भारतीय वैद्यकीय परिषदेने केला असून त्याबाबतची अधिसूचना 2016 मध्ये जारी केली होती. 2017 मध्येही पुन्हा एकदा या आशयाचे परिपत्रक जारी करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.