नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील १०९ मार्गावर खासगी उद्योगसमूहाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त उद्योग समूहांनी सहभागी व्हावं, यादृष्टीनं या निविदा प्रक्रियेतील पूर्वानुभवाची अट काढून टाकण्यात आली आहे .
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या अटीनुसार, आता या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उद्योग समूहांना विमानतळ , वाहतूक अथवा आदरातिथ्य यापैकी कोणत्याही क्षेत्रातील पूर्वानुभव नसेल तरी रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल.
जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यासंबंधीच्या मूळ आराखड्यात बोली लावणाऱ्या उद्योग समूहांचा किमान ३ क्षेत्रात तरी किमान वर्षभराचा अनुभव असावा अशी अट घालण्यात आली होती मात्र त्यामुळं रेल्वेच्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उद्योग समूहांची संख्या खूपच मर्यादित होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर, ही संख्या जास्तीत जास्त असावी या उद्देश्याने पूर्वानुभवाची अट रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे .
देशभरातील एकंदर १०९ मार्गावरील किमान १५१ रेल्वे गाड्या या माध्यमातून चालवल्या जाणार असून त्यात किमान ३० हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक अपेक्षित आहे .