मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं, की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबर महिन्यात परिक्षा घेणं शक्य नाही.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला असून याबाबत सर्व कुलगुरूंची मतं जाणून घेतल्यावरच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षा न घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळविलं होतं. अनुदान आयोगालाही पत्र पाठवलं होतं. पत्रव्यवहार करूनही आयोगाकडून उत्तर आलं नसल्याचं सामंत यांनी सांगितलं.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावं, यातही एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल तर विद्यापीठानं त्याला आपल्या अधिकारात वाढीव गुण देऊन उत्तीर्ण करावं अशी शिफारस कुलगुरूंच्या समितीनं केल्याची माहितीही त्यांना दिली.
अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना, सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा आहे, त्यांची परीक्षा कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर घेतली जाईल असंही या निर्णयात म्हटलं होतं. परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक आहे असं सांगत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.