महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन
मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून तसेच महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कृपया खालील नमूद सुचनांचे पालन करावे.
व्हाट्सॲप वापरताना घ्यावयाची दक्षता
तुम्ही व्हाट्सॲप ग्रुपचे सदस्य असाल तर काय करावे ?
चुकीच्या /खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये.
आपल्या ग्रुपमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अजून पुढे कोणालाही पाठवू नये.
जर आपण सदस्य असणाऱ्या ग्रुपवर काही खोटी, चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडिओज किंवा पोस्ट्स येत असतील की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशा पोस्टबद्दल सदर ग्रुप ॲडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता तसेच त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) पण देऊ शकता.
ग्रुप ॲडमिन, ग्रुप निर्माते (creator) असाल तर काय करावे ?
ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य (member) हा एक जबाबदार व विश्वासार्ह व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला ग्रुपमध्ये सामील करावे. ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून सांगावी. ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्टसचे नियमितपणे परीक्षण करा. परिस्थिती अनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून only admin असे करावे, जेणेकरून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.