मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता मार्गदर्शक सूचना आणि निर्बंधांबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका आय़ुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. या आदेशानुसार, कोणत्याही इमारतीच्या एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकांमध्ये बाधित रुग्ण आढळल्यास संबंधित इमारतीचा संपूर्ण मजला सील करण्यात येईल. गृहनिर्माण संस्थेच्या एका इमारतीत 26 किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्यात येईल. गृहनिर्माण संस्थेत जर एकापेक्षा जास्त इमारती असतील तर केवळ बाधित असलेल्या इमारतीचं प्रवेशद्वार सील केलं जाईल, मुख्य प्रवेशद्वार सील केलं जाणार नाही. बाधित आढळलेली इमारत किंवा सदनिका ही रुग्ण बाधित आढळलेल्या दिवसापासून पुढचे सात दिवस ही इमारत सील असेल, त्यानंतर ती खुली करण्यात येईल. घरगुती काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या असल्यास त्यांना बाधित रुग्ण असलेल्या सदनिका, मजला आणि इमारत सोडून इतर सर्वत्र प्रवेश दिला जाईल.