नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक आर्थिक घोटाळ्यातले आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना मुक्त करू नये, असे सीबीआयनं सातारा जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सात मार्च रोजी या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघे फरार असल्याचं, सीबीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. हे दोन्ही आरोपी पाचगणीच्या एका विलगीकरण कक्षात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली असून, सीबीआयच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय या दोघांना तिथून जाण्याची परवानगी देऊ नये, असं सीबीआयनं सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या काळात नियम डावलून, वाधवान कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी स्वतःच्या स्वाक्षरीनं पत्र जारी केल्याप्रकरणी, राज्याच्या गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या विरोधात राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.
या चौकशीसाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल सरकारला सादर करेल.
सरकारनं अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तसंच त्यांच्या जागी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव श्री कांत सिंह यांच्याकडे पुढच्या आदेशापर्यंत गृहमंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवपदाचा अतिरिक्त  कार्यभार सोपवला आहे.