नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ४१२ झाली असून मृतांची संख्या १९९ वर पोचली आहे. आतापर्यंत ७०९ लोकांवर उपचार करून त्यांना घरी सोडलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या २४५ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्ण संख्या १ हजार ३८० वर पोचली आहे. यात सर्वाधिक ८७६ रूग्ण मुंबईतले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. २५ रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना घरी सोडलं आहे. सध्या राज्यात १ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, राज्यात आजपर्यंत चाचणी केलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४ हजार ७३१  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
काल राज्यात २५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी पुण्यात १४, मुंबईत ९,  तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरेनाबळींची संख्या ९७ झाली आहे.
राज्यातल्या ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणली जात आहे. राज्यात एकूण ४ हजार २६१ सर्वेक्षण पथकं काम करत असून त्यांनी १६ लाखाहून अधिक लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे. मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यासाठी  गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे,असं टोपे यांनी सांगितलं.