नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं कोरोना तपासणीबाबत नियोजन केलं आहे. त्यासाठी पालिका कार्यक्षेत्रात २७ फ्लू क्लिनिक, कोव्हिड केअर सेंटर, २ डेडिकेटेड हेल्थ सेंटर सुरू केले आहेत. महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांसोबतच नेरूळ, ऐरोली, तुर्भे, बेलापूर या रूग्णालयांमध्ये फ्लू क्लिनिक सुरू केलं आहे. ताप, खोकला, सर्दी, श्वासोच्छवास या लक्षणांसाठी या क्लिनिकमध्ये उपचार केले जाणार आहेत.
तर कोरोनासदृश लक्षणं असणाऱ्या नागरिकांसाठी वाशी फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारत, सानपाडा इथलं एमजीएम रूग्णालय या ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. मध्यम स्वरूपातील कोव्हीड-19 रुग्णांवर वाशी इथल्या हिरानंदानी फोर्टिज रूग्णालय किंवा कोपरखैराणेच्या रिलायन्स रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. तर वाशी इथलं महापालिकेचं सार्वजनिक रूग्णालय गंभीर स्वरूपातल्या कोरोनाग्रस्तांसाठी घोषित केलं आहे.