नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खासगी वैद्यकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मुदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन वैद्यकीय विमा योजना सुरु केल्या आहेत.
भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार या नव्या योजना सुरु केल्या आहेत. किमान ५० हजार रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण त्याद्वारे मिळू शकेल. त्यासाठी किमान ६४० रुपयांपासून ते कमाल १२ हजार रुपयांपर्यंतचा वार्षिक हप्ता भरावा लागणार आहे.
नेहमीच्या आरोग्य विमा योजनेत कोरोनाचा समावेश असला तरी त्या योजनेसाठीचा वार्षिक हप्ता कितीतरी अधिक असल्याचं लक्षात आल्यानेच विमा नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या नव्या योजना सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य विमा कंपन्यांना दिले होते.
खास कोरोनासाठीच्या या विमा योजना किमान साडेतीन महिन्याच्या मुदतीपासून कमाल साडेनऊ महिन्यांच्या मुदतीसाठी तयार केल्या गेल्या आहेत.