मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. हिंदमाता आणि माटुंग्यासह सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवले आहेत. दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सांताक्रूज ६३, वांद्रे ९५, महालक्ष्मी 43, राम मंदीर ६८, तर कुलाब्यात १२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. येत्या चोवीस तासात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून धोक्याचा लाल बावटा फडकावला आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी याविषयी माहिती दिली.
बुलडाणा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पहाटे ४ पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. संग्रामपूर तालुक्यातल्या एकलारा या गावाचा संपर्क तुटला आहे. जळगाव जामोद तालुक्यातल्या जामोद या गावांमध्ये बेंबळा नदीला पूर आला असून शेगाव तालुक्यातल्या तिंत्रव या गावांमध्येही जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन प्रभावित झालं आहे. दमदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसापासून शेतकरी चिंतेत होता. आता मात्र शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.
जालना शहरासह तालुक्यातल्या काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात भोकरदनसह तालुक्यातल्या तांदुळवाडी, मुठाड, मालखेडा, जैनपूर कोठारा, मनापूर, आव्हाणा, सेलूद, सुभानपूर, पिंपळगाव रेणुकाई, पारध, नांजा, विरेगाव, भायडी, राजूर या परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली. बदनापूर शहर पसिरातही तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचलं. अंबड शहरासह तालुक्यातल्या काही भागात काळी वेळ पाऊस पडला.