मुंबई : मुंबईमधील जीर्ण झालेल्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असे निर्देश राज्यमंत्री परिणय फुके यांनी दिले.
मुंबई विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीबाबत आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान राज्यमंत्र्यांनी मॅजेस्टिक आमदार निवासाच्या दुरुस्तीबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच हे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच स्वछतेला प्राधान्य देण्यासाठी मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर जेवणाचा डबा धुण्यासाठी सिंकची सोय करण्यात येणार असल्याचे तसेच वरळी येथील निवास विश्रामगृह संपूर्ण वातानुकुलित करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करून सुशोभित केलेल्या शासकीय इमारतींचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, मुख्य अभियंता सुनील वांडेकर, अधीक्षक अभियंता सूर्यवंशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.