मुंबई : भौगोलिक कारणामुळे स्वातंत्र्यानंतर अद्यापही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सारख्या दुर्गम भागातील काही आदिवासी व दुर्गम गावाचे विद्युतीकरण झालेले नाही अशा गावांचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन महावितरणला या संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

राज्यात मेळघाट सारख्या दुर्गम भागातील काही गावात जर वीज पोहचली नसेल तर याची माहिती घेऊन तेथे विद्युतीकरण करण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश देऊन डॉ. राऊत यांनी, वनक्षेत्रातील ज्या भागात वीज यंत्रणा उभी करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळाली नसेल तर यासाठी वनविभागासोबत तातडीने संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या.

यासोबतच महावितरणचे सदोष जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविणे, नादुरुस्त रोहित्रे व ऑईल पुरवठा या बाबीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

समृद्धी महामार्गाला समांतर वीजवाहिन्या टाकणे, कोस्टल रोड क्षेत्रामध्ये भूमिगत वाहिन्या टाकणे, डॅशबोर्ड प्रणाली अद्ययावत करणे, पे पेंडीग व नव्याने अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय (एसएसी, एसटी, ओबीसी) लाभार्थ्यांना जोडण्या उपलब्ध करून देणे, राज्यातील चारही वीज कंपनीच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदी करणे व ‘एक गाव एक दिवस मेंटेनन्स’ योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी यावेळी दिल्या.