नवी दिल्ली : सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण सुरु आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
ते काल संयुक्त राष्ट्रांच्या, आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्चस्तरीय व्हर्चुअल बैठकीच्या समारोप सत्रात बोलत होते. जगात शाश्वत शांतता आणि समृद्धीचा मार्ग, सर्व देशांच्या संयुक्त प्रयत्नांनीच गाठता येतो यावर भारताचा ठाम विश्वास आहे, असं ते म्हणाले.
विकास साधताना कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे, भारताचा सर्वसमावेशक विकास करताना योग्य मार्ग आणि जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे असंही ते म्हणाले.
गेल्या सहा वर्षात भारतानं विकासाची अनेक कवाडं खुली करुन, गरीब जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असं सांगत, त्याचा संक्षिप्त तपशील पंतप्रधानांनी यावेळी मांडला.
स्वच्छ भारत अभियान, आर्थिक समावेशकता, सगळ्यांना घरं, आयुष्यमान योजनेतून आरोग्य कवच, या योजना भारत राबवत आहे. भारतात आर्थिक समावेशकता आणत असताना, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, असं ते म्हणाले.
शाश्वत विकासाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं, इतर विकसनशील देशांना सहकार्य करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणं ही आमची जबाबदारी आहे असं सांगत, पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनाबाबत त्यांनी भारताची बांधिलकी, यावेळी व्यक्त केली.
कोरोना विरोधात सरकारच्या सहकार्यानं भारतात जनआंदोलन उभं राहिलं, भारतात कोरोनातून बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. कोरोना काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडत, भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे, या संकट काळात भारतानं १५० देशांना मदत केली असं मोदी यांनी सांगितलं.