मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती देण्याची प्रक्रिया गतिमानपद्धतीनं राबविली जावी, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं,अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचं यात म्हटलं आहे.
मार्च २०२० मध्ये राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकांमुळे लागू झालेली आचारसंहिता, आणि त्यानंतर कोविड १९ महामारीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही, मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२ लाख ९० हजार पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै २०२० अखेर २७ लाख ३८ हजार खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रखमेचा लाभ देण्यात आला आहे.