आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान
भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान
वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या तांत्रिक बदलांसाठी सरकार कटीबद्ध : पंतप्रधान
किफायतशीर आणि त्रास-मुक्त अशा एकात्मिक, तंत्रज्ञान व डेटा आधारीत आरोग्य सेवा प्रणालीच्या विकासाकडे भारताची वाटचाल:पंतप्रधान
आयबीएम सीईओंनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या ध्येयावर विश्वास, आयबीएमच्या भारतातील भव्य गुंतवणूक योजनेची दिली पंतप्रधानांना माहिती
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी अरविंद कृष्णा यांचे यावर्षीच्या सुरुवातीला आयबीएमचे जागतिक प्रमुख झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी आयबीएमचे भारताशी असलेले मजबूत नाते आणि व्याप्ती, जी 20 शहरांमध्ये असून यात एक लाखाहून अधिक व्यक्ती काम करत आहेत, याचा उल्लेख केला.
कोविडचा व्यवसायावर झालेल्या परिणामाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘वर्क फ्रॉम होम’ मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले आहे आणि सरकार यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, जोडणी आणि तांत्रिक बदलासाठींचे नियामक वातावरण यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयबीएमने 75% कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यासाठी राबवलेल्या योजनेचे तंत्रज्ञान आणि आव्हाने यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी यावेळी आयबीएमने देशभरातील 200 शाळांमध्ये सीबीएसईच्या सहाय्याने कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम (AI curriculum) सुरु केल्याबद्दल प्रशंसा केली. ते म्हणाले, सरकार विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ), मशिन लर्निंग याविषयी सुरुवातीलाच माहिती देण्यासाठी प्रयत्नरत आहे, जेणेकरुन देशात तंत्रज्ञान अनुकूल वातावरण तयार होईल. आयबीएमचे सीईओ म्हणाले की, तंत्रज्ञान आणि विदा या बाबी गणिताप्रमाणे प्राथमिक कौशल्यात समाविष्ट केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्या अधिक लवकर आणि तन्मयतेने शिकवल्या जातील.
पंतप्रधानांनी अधोरेखीत केले की, भारतात गुंतवणूकीसाठी सध्याची अतिशय योग्य वेळ आहे. ते म्हणाले की, देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीचे स्वागत होत आहे आणि समर्थन मिळत आहे. ते म्हणाले की, जगात मंदीचे वातावरण असताना भारतात परकीय गुंतवणूकीचा ओघ वाढत आहे. देश स्वावलंबी भारत या संकल्पेनसह मार्गक्रमण करत आहे, जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल, असे पंतप्रधान म्हणाले. आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आयबीएमच्या भारतातील भरीव गुंतवणूक योजनेची माहिती दिली. त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या ध्येयावर विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षांतील आरोग्यक्षेत्राच्या सुधारणेची माहिती दिली आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा नागरिकांच्या आवाक्यात असतील असे आश्वस्त केले. त्यांनी आरोग्य क्षेत्रात, रोगनिदान आणि विश्लेषणासाठी भारतकेंद्री कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणांविषयीच्या शक्यतेविषयी माहिती दिली.
त्यांनी अधोरेखीत केले की, किफायतशीर आणि त्रास-मुक्त अशा एकात्मिक, तंत्रज्ञान व डेटा आधारीत आरोग्य सेवा प्रणालीच्या विकासाकडे भारताची वाटचाल आहे. आरोग्यक्षेत्रात आयबीएम महत्त्वाची भूमिका निभावेल, असे पंतप्रधान म्हणाले. आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे कौतुक केले लवकर रोगनिदान व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी चर्चा केली.
विदा सुरक्षा, सायबर हल्ले, गोपनीयतेबद्दल चिंता आणि योगामुळे आरोग्याला होणारा लाभ यावरही उभयतांमध्ये चर्चा झाली.