मुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ

मुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहर जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार/ मजूर हे त्यांच्या गावी परत गेल्याने किंवा जात असल्याने आता टाळेबंदी उठविल्यानंतर हे उद्योग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. उद्योगांना मनुष्यबळाची तर युवकांना रोजगाराची गरज असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक यांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित १३ कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदासाठी अर्हता पात्र किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स (skype, Whatsapp, etc) द्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक असून तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईलधारकांनी mahaswayam हे पोर्टल डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावी.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे या वेबपोर्टलवर अधिसूचित करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नियोक्ते आणि रोजगार इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या  सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.