नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे भारतीय संसदेच्या आणि भारत सरकारच्या अखत्यारित असलेल्या बाबींमधे परदेशी संस्था हस्तक्षेप करत आहेत, याबद्दल चिंता वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा हस्तक्षेपाचे प्रयत्न अनावश्यक असल्याचं सांगत, भविष्यात अशा विषयांवर वक्तव्य करण्यापासून परदेशी संस्था दूर राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एक परिपक्व प्रजासत्ताक आणि लोकशाही राजकीय व्यवस्था म्हणून भारत आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. भारतानं अनेक आव्हानं यशस्वीरित्या झेलली असून, त्यावर मातही केली आहे, आणि आता तर भारत अधिक एकजूट असून, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता या तत्वांशी बांधील आहे, असं ते म्हणाले.