मुंबई दि. 24 : देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दिंगत व्हावा याकरिता राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा मोफत दाखविण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.

माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत सिनेमाचे वितरक,सिनेमागृहांचे मालक, चित्रपट संघटना यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. या बैठकीस विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.निलंगेकर यांनी सांगितले की, या सिनेमाचे खास प्रक्षेपण करण्यामागे मुख्य उद्देश हा  युवकांमध्ये राष्ट्रकर्तव्याची भावना निर्माण करणे असा आहे. कारगिल विजय दिनाचे महत्त्व पाहता हा सिनेमा मोफत दाखविण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. येत्या २६ जुलै,२०१९ रोजी सकाळी १० वाजता या सिनेमाचे प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात होत असून चित्रपट वितरक, सिनेमागृह मालक, चित्रपट संघटना यांनी देशाप्रती असलेले कार्य मानून यास सहमती दिलेली आहे. त्यामुळे या कारगिल विजय दिनी खऱ्या अर्थाने भारतमातेच्या सर्व सुपुत्रांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सिनेमाचे मोफत प्रक्षेपणाबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. सिनेमागृहात मोफत सिनेमा प्रक्षेपणाबाबतचे यशस्वी आयोजन करण्याकरिता पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी अशा सूचना श्री.निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या. सदर कार्यक्रमाचे परिपत्रक शासनाद्वारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.