उद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं – इरफान सय्यद

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कोरोना जनजागृती, मास्क व इतर साहित्यांचे वाटप करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. यास साद घालीत, खेड-भोसरी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी चिंचवड येथील महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या कार्यालयात सामाजिक सुरक्षिततेचे पालन करीत, हजारो कामगारांना अर्सेनिक अल्बम ३०, तापाच्या गोळ्या, मास्क, सॅनिटायजर, हॅन्डग्लोज या सेफ्टी किटचे वाटप केले.

सध्या संपूर्ण राज्यावर कोरोनाचे सावट आहे. पिंपरी चिंचवड शहरात सोळा हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाने बाधित झालेली आहेत. राज्य सरकारने मोठ्या कसोशीने कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे. त्यात उद्धवजींचा मोठा वाटा आहेच. यावेळी उपस्थित सर्व कामगार बांधवांमध्ये कोरोना विषाणूबाबतची जनजागृती केली. त्यांना कोरोनापासून दूर राहण्याबाबतच्या आरोग्यविषयक बाबी समजावून सांगितल्या. मास्क व नेहमी हात धुण्याबाबतचे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, सल्लागार बाळासाहेब शिंदे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, उपाध्यक्ष किसन बावकर, सेक्रेटरी भिवाजी वाटेकर, उपाध्यक्ष मुरलीधर कदम, उपाध्यक्ष खंडू गवळी, उपाध्यक्ष ज्ञानोबा मुजूमले, सेक्रेटरी पांडूरंग कदम, सेक्रेटरी सर्जेराव कचरे, प्रमोद शेलार, संतोष सोळुंके, निलेश मोरे, सतीश कंठाळे तसेच शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

इरफान सय्यद म्हणाले की, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. या संकटात कोरोना सेफ्टी किट, जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामगारांना कोरोनाच्या सेफ्टी किटचे वाटप केले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वभावाला साजेसं शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं. शिवसेना टिकवलीच नाही तर वाढवली. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं. आजपर्यंतची शिवसेनेची वाटचाल, विचारधारा या सगळ्यापासून दूर जाणारा निर्णय उद्धवजींनी घेतला. महत्त्वाचं म्हणजे ते त्यावर ठाम राहिले. त्यांच्यातील धाडसी नेतृत्वाचा तो पुरावा होता. त्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. शिवसेनेच्या या ढाण्या वाघाला आणि आमच्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो! याच सदिच्छा, अशा शब्दात इरफानभाई यांनी उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या.