नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गटात एक दुष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश, राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य सेवा केंद्रांनाही, अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.