पंतप्रधानाच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी रेल्वे वचनबद्ध – रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. या दिशेने रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनीही पुढाकार घेतला आहे. देशाला आत्मनिर्भर बनवण्याबरोबरच जगामध्ये देश सामर्थ्यवान बनला पाहिजे, याचा विचार करून भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी या कंपनीने आणि भारतीय स्टेट बँकेने एकत्र येवून ‘रूपे’ माध्यमातून नवीन संपर्कविरहित क्रेडिट कार्ड प्रचलनामध्ये आणले आहे. हे नवीन कार्ड रेल्वे आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी देशाच्या सेवेसाठी आज समर्पित केले.
यावेळी बोलताना रेल्वे मंत्री गोयल म्हणाले,‘‘ पंतप्रधानांच्या आवाहनाप्रमाणे ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देवून रेल्वेला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ‘रूपे’ माध्यमातून आयआरसीटीसी आणि स्टेट बँकेचे संयुक्त क्रेडिट कार्ड आणले आहे. रेल्वेने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत अनेक प्रकल्प राबवले आहेत, त्यापैकीच हा संयुक्त ब्रँडचा उपक्रम आहे.
ग्राहकांना सुरक्षित वातावरणामध्ये व्यवहार करता यावेत, या उद्देशाने या नवीन रूपे क्रेडिट कार्डामध्ये ‘फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे पॉस (पीओएस) यंत्रावर वापरकर्ते आपले कार्ड फक्त ‘टॅप’ करून व्यवहार करू शकणार आहेत. तसेच वापरकर्त्याने कार्ड स्वाईप करण्याची गरज असणार नाही.
ज्या लोकांना रेल्वेने वारंवार प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी या नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्डची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्डमुळे नियमित प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसचे कार्डधारकांना किरकोळ खरेदीमध्ये सवलत, भोजन आणि मनोरंजनासाठी काही सवलत मिळू शकणार आहे. तसेच या कार्डधारकांना व्यवहार शुल्क माफ करण्यात आले आहे.
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून या कार्डधारकांनी आरक्षण केल्यास 1एसी, 2एसी, 3एसी, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कारचे तिकीट घेताना 10 टक्क्यांपर्यंत मूल्य परतावा मिळणार आहे. तसेच कार्डधारकांना ऑनलाइन व्यवहार शुल्क माफ असणार आहे. ( व्यवहार रकमेच्या 1टक्का), एक टक्का इंधन अधिभार माफ करण्यात येणार आहे. तसचे रेल्वे स्थानकांवरच्या प्रिमियम लाउंजमध्ये वर्षातून चारवेळा (प्रत्येक तिमाहीत एकदा) मोफत प्रवेश दिला जाणार आहे. कार्डाचा वापर करण्यास प्रारंभ करतानाच कार्डधारकाला 350 बोनस पॉइंट देण्यात येणार आहेत. आयआरटीसीच्या संकेतस्थळावरून तिकिटांचे आरक्षण केल्यानंतर त्या रकमेनुसार ठराविक पॉइंट जमा होणार असून विविध आकर्षक बक्षीसे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रेल्वे प्रवासाव्यतिरिक्त ऑनलाइन खरेदी करताना हे जमा झालेले पॉइंट वापरणे शक्य होणार आहे. आयआरटीसी-एसबीआय कार्डाव्दारे ऑनलाइन खरेदी पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. त्याचेही फायदे ग्राहकांना घेता येणार आहेत. ई-कॉमर्स संकेत स्थळांसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.