मुंबई : मुंबई नागपूर जलदगती मार्गाचं ४० टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत इगतपुरी ते नागपुर हा रस्ता पूर्णपणे  कार्यान्वित होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली.

७०१ किलोमीटर लांबीच्या या जलदगती मार्गाला “हिंदुहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असं नाव देण्यात आलं आहे. डिसेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत रस्त्याचा इगतपुरी ते नागपूर हा भाग वापरासाठी तयार होईल मात्र, विदर्भातून जाणारा काही भाग पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत तयार होईल, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पत्रकारांना सांगितलं.

१० जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या या जलदगती महामर्गालगत २० नागरी वस्त्याही उभारण्यात येणार आहेत.  कोरोना उद्रेकामुळे महामार्गाच्या आठव्या मार्गिकेचं काम रखडलं असलं तरी महामंडळ ही त्रुटी भरुन काढेल, असा विश्वासही मोपलवार यांनी व्यक्त केला.