नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं काल अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. १ ऑगस्ट २०२० पासून अनलॉकचा तिसरा टप्पा लागू होणार आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे.

योगाभ्यास संस्था आणि व्यायामशाळा, ५ ऑगस्टपासून सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, प्रमाणित कार्यपद्धती जारी करेल. त्याअंतर्गत दिलेल्या नियमांचं कठोर पालन बंधनकारक असेल.

शारीरिक अंतर आणि इतर नियमांचं पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करायला परवानगी दिली आहे. मेट्रो, चित्रपटगृह, नाट्यगृह, प्रेक्षागार, क्रीडागार, सभागृह, मनोरंजन केंद्र, बार, सामाजिक-राजकीय-क्रीडा-मनोरंजनात्मक-शैक्षणिक-सांस्कृतिक-धार्मिक सोहळे आणि लोकांची एकत्र गर्दी होणारे इतर कार्यक्रमही बंदच राहतील.

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत सल्लामसलत केल्यावर, शाळा, महाविद्यालयं आणि खासगी शिकवणी वर्ग, ३१ ऑगस्ट पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला वंदे भारत मोहिमे अंतर्गतच, मर्यादित स्वरुपात परवानगी दिली आहे.

नियमित विमान उड्डाणं, सध्या न होता, नंतर परिस्थिती नुसार टप्प्या टप्प्यानं सुरु होतील. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनच्या सर्व नियमांचं ३१ ऑगस्टपर्यंत पालन करणं बंधनकारक असेल. प्रतिबंधित क्षेत्रांची यादी, संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल.