नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत ट्विटरवरुन कौतुक केलं आहे. तसंच मदतीचा हातही दिला आहे.
विजया पवार यांनी हडप्पानी घुर बंजारा महिला कला विकास संस्थेच्या माध्यमातुन लोप पावत चाललेल्या बंजारा हस्तकला जिंवत ठेवण्याकरता २००४ साली सुरुवात केली.
बीडमधल्या बंजारा वस्तीमध्ये जाऊन त्या महिलांना एकत्र करत बंजारा हस्तकला भरत काम सुरु केलं. त्यांनी एक हजार महिलांना आतापर्यंत याबाबतचं प्रशिक्षण दिलं असून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागानं प्रशिक्षण, प्रचार विविध साधनं घेण्याकरता एक कोटी रुपयांचं अनुदान दिलं असून जपान कौन्सिलनंही या हस्तकलेची विशेष दखल घेत त्यांनीही प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ५५ लाख रुपये दिले आहेत. अशी कला संस्कृती जोपासण्याकरता या महिलांच्या हाताला बळ देण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.