कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा १० लाखांवरुन १४ लाख – एमआयडीसीच्या वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 58 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा दहा लाखांहून 14 लाख करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू केले जाणार आहे अशा दोन महत्त्वाच्या घोषणा महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या.
श्री. देसाई म्हणाले, राज्याच्या प्रगतीत महामंडळाचा खारीचा वाटा राहिला आहे. जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त संघटनेत एमआयडीसीचा अभिमानाने उल्लेख केला जातो. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसीला जागतिक दर्जाचे महामंडळ बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रॅज्युएटीची मर्यादा दहा लाखांवरून 14 लाख करण्यात येईल. येत्या काळात महामंडळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभे केले जाणार आहे. या निमित्ताने देश-विदेशातील गुंतवणूक राज्यात येईल. याशिवाय रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आदर्शवत फार्मा पार्क सुरू केले जाईल.
कोरोना संकटात एमआयडीसीने उल्लेखनीय काम केले. गरजुंना अन्नधान्य वाटप केले. औरंगाबादमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. मराठवाड्यातील पहिली व्हायरालॉजी लॅब सुरू केली. याचे सर्व श्रेय महामंडळाला जाते, असे उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन म्हणाले की, कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे ठप्प असताना केवळ उद्योग विभाग सतत काम करत होता. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात महामंडळाचे अस्तित्व आहे. लघु उद्योगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. 25 हजार कोटींचे सामजंस्य करार केले. महापरवाना, महाजॉब्ज, सीएम रिलिफ फंडला 160 कोटी रुपये मिळून दिले. साडेसातशे टन धान्य कोरोनाग्रस्त भागात दिले.
एमआयडीसीच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, अभिषेक कृष्णा, एमआयडीसी कर्मचारी संघटनेचे हेमंत संखे, विलास संखे, सुधाकर वाघ, डी. बी. माली, पी. डी. मलिकनेर यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण यावेळी सहभागी झाले होते.