????????????????????????????????????

पुणे :  प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेली पाहिजे,  असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  पुणे विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या विषयावर त्‍यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याची महत्‍त्‍वाकांक्षी योजना जून 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी राज्याला 19 लाख 40 हजार इतके उद्दिष्ट असून पुणे विभागाला 4 लाख 48 हजार 610 तर पुणे जिल्ह्याला 2 लाख 99 हजार 75 घरकुलाचे उद्दिष्ट शासनाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत, ख-या लाभार्थ्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रसिद्धी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून जिल्हाधिकारी राम म्हणाले, या घरांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्या-त्या नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या समन्वय आणि पुढाकारातून उत्कृष्ट कार्य होऊ शकते, असेही ते म्‍हणाले. या योजनेशी  संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय आणि समर्प‍ित भावनेने काम करून हीयोजना यशस्वी करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी श्री राम यांनी केले.