????????????????????????????????????

महसूल व पोलीस अधिकारी कार्यशाळेचा समारोप

पुणे : महसूल विभागात काम करताना आपल्‍या विषयाचे अधिकाधिक ज्ञान संपादन करुन  कामातून आपले अस्तित्व सिध्द करुन दाखवा, हे करत असताना कुटुंबालाही वेळ द्या, असा मौलिक सल्ला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला. पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त व उपजिल्हाधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. या कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, दैनंदिन कामकाज करताना अथवा कोणत्याही प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी संबंधित प्रकरणाबाबत सखोल वाचन करुन अभ्यासपूर्वक वेळेत निकाल द्या. कायद्यांतील विविध तरतुदींचे ज्ञान घ्या. आपल्या अंगी क्षमता असली तरी परिश्रम घेऊन कामात सातत्य ठेवत ही क्षमता सिध्द करुन दाखवा. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून या क्षेत्रात झोकून देऊन काम करा. तसेच गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योग्य सेवा द्या, असे सांगून डॉ.म्हैसेकर म्हणाले, कार्यालयीन जबाबदा-या पार पाडत असताना कुटूंबियांप्रती असणारी कर्तव्ये आनंदाने पार पाडायला हवीत. टिव्ही, मोबाईल अशा मनोरंजनाच्या साधनांमध्ये वेळ न दवडता हा वेळ आपल्या मुलांसाठी व कुटुंबियांसाठी द्यायला हवा. लहान मुले ही आपल्या आचरणातून शिकत असतात, हे लक्षात घेऊन स्वत: योग्य आचरण ठेवून मुलांपुढे आपला आदर्श निर्माण करा. तसेच आपल्या पदाचा अहंकार न बाळगता नम्रपणे व मोकळा संवाद ठेवा, कामाचा ताण येऊ नये यासाठी छंद जोपासा तसेच व्यायामाची जोड द्या, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सोलापूरचे जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, आपल्या क्षेत्राशी संबंधित कायद्यांचे व शासन निर्णयांचे नियमित वाचन करणे आवश्यक आहे. अधिकाधिक माहिती घेऊन आत्मविश्वास वाढवा. वेळेचे नियोजन करुन आपले काम दर्जेदार पध्दतीने पूर्ण करुन पुणे विभाग अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असेही ते म्‍हणाले.

पुण्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक ठेवल्यास आपण उत्तम सेवा देऊ शकतो. आपण केवळ एक कर्मचारी नसून समाजाला सेवा देण्यासाठी समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे मनाशी ठरवायला हवे. याबरोबरच कठोर परिश्रम घेऊन आपली भूमिका चोखपणे बजावणे गरजेचे आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी नंद‍कुमार काटकर, साहेबराव गायकवाड तसेच प्रांताधिकारी सुभाष भागडे, विजयसिंह देशमुख, स्वाती देशमुख, किरण कुलकर्णी, शैलश सूर्यवंशी व उपजिल्हाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन स्‍नेहल बर्गे यांनी केले.

 

विविध विषयांवर मार्गदर्शन

कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी प्रादेशिक आराखड्याच्या अनुषंगाने कामकाजाबाबत नगररचना सहसंचालक अविनाश पाटील यांनी तसेच अर्धन्यायिक कामकाज व कार्यपद्धती बाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तर सात बारा संगणकीकरणा बाबत राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात महाराष्‍ट्र महसूल न्यायाधिकरणाचे सदस्य(न्यायिक) व्ही. बी. कुलकर्णी यांनी तर प्रशासकीय कार्यात संवाद कौशल्याचे महत्त्व याविषयी नाशिक विभागाचे उपायुक्त दिलीप स्वामी यांनी माहिती दिली. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना विषयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

कार्यशाळेला पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा‍, सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, डॉ.राजेंद्र भोसले, श्वेता सिंघल, डॉ. अभिजीत चौधरी, अपर आयुक्त सुभाष डुंबरे, अपर जिल्हाधिकारी, महसूल व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.