मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामना झाला. सैन्यदलाचे जवान, चित्रपट कलाकार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कारगिल शहिदांना अभिवादन केले.
मुंबई मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या संघामध्ये अभिनेते अभिषेक बच्चन,अर्जुन कपूर आदींचा समावेश होता. सेनादलातील संघामध्ये नौदल आणि सैन्यदलातील खेळाडू आणि जवानांचा समावेश होता. कारगिल शहीद दिनानिमित्त कुपरेज मैदान येथे नौदल, सैन्यदल आणि हवाईदलाचे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये विविध युद्धसामुग्रीचा समावेश होता. या प्रदर्शनाचे तसेच कार्यक्रमाचे मंत्री श्री. तावडे व श्री. पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सामना दोन सत्रामध्ये खेळविण्यात आला. सैन्य दलाच्या संघाने ३-१ ने सामना जिंकला. सामन्याच्या मध्यंतरात शीख रेजिमेंटने गटका मार्शल आर्टचे सादरीकरण केले.