मुंबई (वृत्तसंस्था) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनानं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून त्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर उद्योग विभागानं तात्काळ कार्यवाही केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता १३०० मेट्रिक टन प्रतिदिन असून १८०० मेट्रिक टन एवढ्या प्राणवायूची मागणी आहे. यापुढील काळात राज्यात ३००० मेट्रिक टन ऑक्सिजन प्रति दिन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवून उद्योग घटकांना प्रोत्साहन देण्याबाबत १२ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.