नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं ३१ मार्च रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला अतिरिक्त असलेली ९९ हजार १२२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत अतिरिक्त असलेली रक्कम हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा, जागतिक आणि देशांतर्गत आव्हानं आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर झालेला प्रतिकूल परिणाम दूर करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा, आढावा घेण्यात आला.

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास, डेप्यूटी गर्व्हनर महेशकुमार जैन तसंच अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.