नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत रामजन्मभूमी स्थानावर आज राममंदिराचं भूमीपूजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर राज्यात विविध कार्यक्रम करण्यात आले. जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी महाआरती, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सांगली इथं १९९२ ला अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्रयात ब्रम्हपुरी इथं रामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. नाशिकमध्ये पंचवटी परिसरात भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं गोदापूजन, तसच काळाराम मंदिराबाहेर श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. लातूर शहर जिल्हा भाजपानं शहरात आंनदोत्सव साजरा केला. शहराच्या विविध भागांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी तर विविध मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली.
परभणीतही विविध मंदिरात राम प्रतिमेचे पूजन करण्यात आलं तर कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला.
अमरावती शहरातल्या चौकात फटाके फोडून तर मंदिरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यात आलं.
वाशिममध्ये भाजपच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाटणी चौकात रामाचा फोटो लावून फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद साजरा करण्यात आला. तर शहरातील पुरातन राम मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली.
उस्मानाबादेत रामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं नागरिकांना मिठाईचं वाटप केलं. धुळ्यातल्या पुरातन श्रीराम मंदिरासमोर खास रांगोळी काढली होती.
तसंच कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला. जळगाव शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत या भूमिपूजन सोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरात आर्कषक पूजा बांधण्यात आली. नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी पूजा करून आनंद व्यक्त करण्यात आला.