मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्ह्यात उद्यापासून १९ ऑगस्टपर्यंत पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात 168 नव्या रुग्णांची भर पडल्यानं कोरोनाबाधितांची  संख्या आता 16 हजार 450 वर पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 318 जणांचा मृत्यु झाला आहे, तर 12 हजार 877 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 211  झाली आहे. त्यापैकी 11 हजार 368 रूग्ण  बरे झाले आहेत. तर, 497 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 346 जणांवर रूग्णालयात उपचार सुरु असल्याचं जिल्हा  प्रशासनानं कळवलं आहे.

अहमदनगरमध्ये काल नवीन १६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात २ हजार १६० रूग्ण उपचार घेत असून आज २१५ रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात  आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या ६२५ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३९६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर २२७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात भाजपाच्या ४ नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात कोव्हिडं केअर सेंटरमध्ये पाठवलं आहे.

धुळे शहरातली कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातली सर्व खासगी रुग्णालये, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधल्या किमान २५ टक्के खाटा कोरोनाबाधितांसाठी आरक्षित ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी दिला आहे. धुळे जिल्ह्यात काल ११५ नविन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे धुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३ हजार ६८९  झाली आहे. काल तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या १२५ वर पोहचली आहे.

बुलडाणा जिल्हयात कोरोणाचे ७८ नवे रुग्ण आढळुन आले.कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार ६१७ झाली असून ६०० च्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज ४ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं कोरोनाबळींची संख्या ३४ वर पोचली आहे.

भंडारा जिल्ह्यात आज 12 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 13 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 227 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 318 झाली असून 82 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.