मुंबई (वृत्तसंस्था) : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं आज उघडीप घेतली. मुंबईच्या उपनगरात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडल्या. मात्र त्यामुळे पाणी भरले नाही. मुंबईत भरलेल्या पाण्याचा ८७० पंपाच्या सहाय्यानं निचरा करण्यात आला.
आज शहर भागात ऊन पडलं होते. मात्र उपनगर सकाळपासून काळवंडलं आहे. मुसळधार पावसानं रस्त्यात पडलेले खड्डे भरण्याची कामं विभागवार सुरू झाली आहेत. वेधशाळेनं पावसाचा इशारा दिल्यामुळे पालिकेची यंत्रणा सज्ज आहे.
रायगड जिल्ह्यात गेले सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर कालपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती कायम आहे. पुरामुळे आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात २०९ पूर्णांक ५ दशांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पडझडीच्या घटना सुरुच आहेत. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चौवीस तासात जिल्ह्यात २४३ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. कोल्हपूरला जोडणाऱ्या गगनबावडा घाटातून वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाहीये. तो सुरळीत करण्याचं काम महावितरणकडून सुरु आहे. आज काही ठिकाणी सूर्यदर्शन झालं, वाऱ्याचा जोरही कमी झाला आहे.
दोन दिवस संततधार धरलेल्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात आज काहीशी विश्रांती घेतली. अधूनमधून तुरळक सरी येत आहेत. मात्र जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांचा पूर ओसरला आहे. सुमारे ४० तास पाण्याखाली असलेल्या चांदेराई बाजारपेठेतलं, तसंच राजापूर बाजारपेठेतलं पाणी आता पूर्णपणे ओसरलं आहे. जिल्ह्यात घरं आणि गोठ्यांचं नुकसान झालं. त्याचे पंचनामे सुरू आहेत. पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे विजेच्या तारा तुटल्यानं, तसंच खांब वाकल्यानं राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यातला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी बहुतांश भागातला वीजपुरवठा सुरू केला असल्याचं महावितरण कंपनीनं सांगितलं.
कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात पावसानं काहीशी उसंत घेतली. मात्र गेले चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, भोगावती नदीपात्रात ७ हजार १०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडून ४४ फुटांवरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातले ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणक्षेत्रात संतधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सतत होत असलेली वाढ आणि पूरसदृश्य स्थिती लक्षात घेऊन, २३ गावांमधल्या साडेसातशे कुटुंबातल्या ४ हजार ४१३ व्यक्ती आणि अकराशे जनावरांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. जिल्ह्यातले अनेक रस्तेही पाण्याखाली गेले असल्यानं कोल्हापूर ते आजरा, कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गांसह जिल्ह्यातल्या ३७ मार्गांवरची वाहतूक बंद झाली आहे.