नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेतील नोकर भरतीबाबत जाहिरात देण्याचा अधिकार रेल्वेशिवाय कोणत्याही खासगी एजन्सीला नाही, असं भारतीय रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. एव्हेस्ट्रान इन्फोटेक या एजन्सीनं एका नामांकित वर्तमानपत्रात रेल्वेच्या आठ विविध विभागांमधील पाच हजार २८५ जागांच्या भरतीची जाहिरात दिली असून, त्यासाठी अर्जदारांना ७५० रुपये शुल्क भरण्यास सांगितले आहेत, दहा सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्याचा उल्लेखही या जाहिरातीत आहे. ही जाहिरात बेकायदेशीर असून, रेल्वेनं अशा कोणत्याही एजन्सीची नेमणूक केली नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

रेल्वेच्या सी आणि डी श्रेणीतील जागांच्या भरती २१ रेल्वेभरती मंडळं आणि १६ रेल्वे भरती विभागांच्या वतीनं केली जाते. कोणत्याही एजन्सी द्वारे नाही. रेल्वेतील जागा भरतीसाठी रेल्वे रोजगार समाचार, राष्ट्रीय दैनिकं आणि स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली जाते.