नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नौदलाच्या नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रम- 33 चे उद्घाटन काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात झाले. गोव्याच्या नेव्हल वॉर कॉलेजने हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल आणि आकादमीय तसेच लष्करी शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल, पेडणेकर यांनी या संस्थेचे कौतुक केले.
भारतीय नौदलाचा, 37 दिवसांचा हा पथदर्शी व्यावसायिक लष्करी शिक्षण अभ्यासक्रम, दरवर्षी नेव्हल वॉर कॉलेजमार्फत घेतला जातो. यात सागरी युद्धनीती, नौदल आणि संयुक्त अभियाने आणि इतर शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते. यावेळी, दक्षिण नौदलविभाग प्रमुख, व्हाईस एडमिरल एक के चावला, PVSM, AVSM, NM, VSM, ADC,यांचे मुख्य भाषण झाले. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्ट्या उत्कृष्ट कौशल्ये शिकण्यावर भर द्यावा असे ते म्हणाले. नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडट रेअर एडमिरल संजय सिंग AVSM, VSM, यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कॉलेमध्ये जोपासल्या जाणाऱ्या, उच्च अकादमीक आणि बौद्धिक आणि लष्करी यश मिळवण्याच्या उज्ज्वल परंपरेचा त्यांनी उल्लेख केला.
या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मोठी संशोधन कामे आणि समीक्षात्मक विचारपद्धती विकसित करुन, त्याद्वारे त्यांच्या बौद्धिक शक्ती-क्षमतेला चालना देणे, या आहे. सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्यांची उकल करतांना त्यांना या अभ्यासक्रमाचा उपयोग होऊ शकेल. एकत्रित, एक पाठक म्हणून काम करण्याची सवय आणि वृत्ती निर्माण व्हावी, यादृष्टीने या अभ्यासक्रमाअंतर्गत, महूच्या आर्मी वॉर कॉलेजमध्ये पाच दिवसांच्या संयुक्त अभियानाचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठातर्फे, “संरक्षण आणि रणनीतीत्मक अभ्यासक्रम’ या विषयातील एम फील ची पदवी प्रदान केली जाते.