नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला दृढ करण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गुजरात मधल्या एकल विद्यालय संघटनेच्या प्रमुखांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

देशात उत्तम शिक्षण आणि कौशल्य विकास वाढीला लागावा याकरता केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले याशिवाय अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, एकलव्य आदर्श रहिवासी शाळा, पोषण अभियान आणि मिशन इंद्रधनुष्य अशा योजनांमुळे, मध्येच शाळा सोडणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.