नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास सुरुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जारी केले. त्यानुसार कॅमे-या समोरील व्यक्ती वगळता इतर सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील. चित्रिकरण स्थळी, रेकॉर्डिंग स्टुडीओ, एडिटिंग रूम्समध्ये वावरतांना सहा फूटांचे शारीरिक अंतर राखणं आवश्यक आहे.

दृश्य, सिक्वेन्स, कॅमेराची जागा, तंत्रज्ञांची जागा, बसणे, भोजन व्यवस्था या सर्व ठिकाणी अंतराचे पालन आवश्यक असून, चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत. याशिवाय सेटवर अन्य व्यक्ती तसंच प्रेक्षकांना परवानगी नाही.

चित्रपट आणि दूरचत्रवाणी हा महत्वाचा उद्योग असून या उद्योगाशी लाखो लोक जोडले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशी चर्चा करून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे आता देशभर चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण सुरु होऊ शकणार आहे.

कोविड महामारीमुळं देशात बहुतांश ठिकाणी चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रम निर्मितीची कामं पूर्णपणे बंद होती तर काही राज्यांनी चित्रीकरणाला अंशतः परवानगी दिली होती. हा उद्योग अर्थव्यवस्थेच अंग असून लाखो  लोकांना यातून रोजगार मिळतो, असं त्यांनी सांगितलं. या निर्णयाबाबत सुप्रिसिद्ध निर्माता दिग्दर्शक मेहुद कुमार यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.