नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम तसंच 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातले प्रमुख सुत्रधार आणि जमात उद दवाचा प्रमुख, हाफीज सईद, जैश ए मोहम्मद चा प्रमुख मसूद अझर यांचा पाकिस्ताननं, पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश केला आहे.

याबाबत पाकिस्तान सरकारनं जारी केलेल्या पत्रकात दाऊद इब्राहिम कराची शहरात राहत असल्याचं नमूद केलं आहे. तसंच 88 अन्य बंदी घातलेल्या दहशतवादी गटांना आणि त्यांचे सर्वेसर्वा, यांना देखील या यादीत टाकण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्र संघानं दिलेल्या माहितीच्या आधारे पाकीस्तानच्या परराष्ट्रीय मंत्रालयानं काल उशिरा ही यादी जाहीर केली.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक कारवाई धडक कृती दलानं पाकीस्तानला काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू केल्यामुळे पाकीस्ताननं ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.