नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत आज काँग्रेस पक्ष मुख्यालयात अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची सलग 7 तास बैठक झाली. या बैठकीत नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्याआधी आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली होती. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं. माजी प्रधानमंत्री मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, सोनिया गांधींना बैठकीमधे हंगामी पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला इच्छुक नसल्यामुळे राहुल गांधी यांनीहे पद स्विकारावं, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के ‍अँटोनी यांनी म्हटलं.

त्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर तसंच मुकूल वासनिक आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष असावा, संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका, सत्तेचं विकेंद्रीकरण, प्रदेश कार्यकारिणींचं सबलीकरण व्हावं, अशा स्वरुपाचं पत्र पाठवलं होतं.

त्यानंतर पक्षाच्या अंतर्गत मुद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाऱ्या नेत्यांबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत हे पत्र पाठवण्यासाठी ही वेळ योग्य नसून, आपण दुखावले गेले आहोत. हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे, प्रसारमाध्यमांमधून नव्हे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-या पृथ्वीराज चव्हाण, मुकूल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली आहे.