नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा काल त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. धरणात अधिक प्रमाणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.

जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, सध्या धरणात १२ हजार ९१६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या ‘प्रतिसाद कक्षाचं’ उद्घाटन काल जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झालं. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोविड-१९चा संसर्ग झाल्यास त्यांना तात्काळ आवश्यक मदत करण्यासाठी हा कक्ष सुरू केला आहे.