नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी करमाफी मिळणार आहे.

कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं विशेष सानुग्रह अनुदान आज जाहीर केलं. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी यापूर्वीच नियमित नियमांपेक्षा अडीच पट भरपाई देण्यात आली आहे. त्यापूर्वी झालेली क्यार आणि महा ही चक्रीवादळं तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नवं पॅकेज जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.