मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून हजेरी लावली असून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली असून दुपारपर्यंत पावसानं चांगलाच जोर पकडल्याचं दिसून येत आहे . मुंबईतही येत्या चोवीस तासात हवामान ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या तलावांत पाण्याची पातळी वाढत आहे. परिणामी पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. सध्या सर्व तलावात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान आता भागल्यात जमा आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा हे दोन मोठे तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत.
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनचं पावसानं सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे. सकाळी जोरदार तर आता मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहेत. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातली जवळपास सर्वच लहानमोठी धरणं जवळपास शंभर टक्के भरली असून त्यातून विसर्गही सुरू आहे. वैतरणा आणि पिंजाळ या मुख्य नद्या ही मोठ्याप्रमाणात भरल्या आहेत. त्यांच्या पाणीपातळीत ही वाढ झाली आहे. मात्र या नद्यांनी त्यांची इशारा पातळी अजून ओलांडली नाही.
भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. गेल्या २४ तासांत ८९.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २२ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले आहेत.
धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळित झालं असलं तरी जिल्ह्यातला कोणताही मार्ग बंद नाही.
अमरावती जिल्ह्यातही रात्रीपासूनच पाऊस असून सकाळपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या कालावधीत झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासनानं ६८ कोटी रुपययांचा निधी मंजुर केला. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी जलसंपदा आणि लाभक्षेत्र तथा कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता.