नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोवीड-१९ या आजारानं बरे होण्याचा दर ७६ पूर्णांक ६२ शतांश टक्के एवढा झाला आहे. कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ लाख ७४ हजार आठशे एक झाली असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

तपासण्यांचं वाढतं प्रमाण तसंच योग्य उपाययोजना, यामुळे या आजारानं होणाऱ्या मृत्यूचा दर कमी झाला असून, सध्या तो १ पूर्णांक ७८ टक्के इतका झाला आहे. देशात काल ७८ हजार ५१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून देशात या आजारानं बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा ३६ लाख २१ हजार २४५ झाला आहे. सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आतापर्यंत देशात ४ कोटी २३ लाख तपासण्या झाल्या असून सध्या १ हजार चार सरकारी आणि ५८३ खाजगी प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या करण्यात येत आहेत.