मुंबई : संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबई येथील दूतावासाचे प्रभारी प्रमुख सौद अब्देलअझीझ अलझरुनी यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध अतिशय जुने असून उभय देश सामायिक संस्कृतीच्या धाग्याने जोडले आहेत. अबुधाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य मंदिराचे उद्घाटन झाले होते याचे स्मरण देऊन अमिराती सर्व धर्म व संस्कृतींचा समान आदर करीत असल्याचे सौद यांनी सांगितले. संयुक्त अरब अमिरातीचे अनेक नागरिक वैद्यकीय उपचार, पर्यटन, व्यवसाय व नातलगांना भेटण्यासाठी भारतात येत असल्याचे सांगून, कोरोना संकट संपल्यावर हे सर्व लोक पुनश्च भारतात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील संबंधांना ऐतिहासिक संदर्भ असल्याचे सांगून सामायिक भाषा, संस्कृती व अन्न याद्वारे उभय देशांमधील लोकांमध्ये असलेले परस्पर स्नेहबंध आगामी काळात अधिक दृढ होतील असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.