मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणातून ५ हजार ७४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातल्या २२ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा फटका ५ हजारापेक्षा जास्त नागरिकांना बसला असून आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक पोलीस तसंच सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टर आणि बोटींच्या मदतीनं या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरु आहे. पुराच्या पाण्यात जनावरं वाहून गेल्याचं वृत्त आहे.
मध्य प्रदेशातलं संजय सरोवर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरच्या बावनथडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं, तसंच मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुरात अडकलेल्यांचा बचाव आणि शोध घेण्याचं काम सुरु असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीनं जिल्ह्यातल्या ४ हजार २०० कुटुंबाना तात्पुरत्या शिबीरात हलवलं आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करून भविष्यात अशी आपत्ती उद्भवणार नाही यासाठीच नियोजन करावं, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले आहेत.