मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईतल्या विविध बोगस लसीकरणांची सर्व प्रकरणे ही खाजगी आयोजने होती, यात २ हजार ५३ जणांना बोगस लस दिली गेली. त्यापैकी १ हजार ६३६ जणांची तपासणी केली आहे, त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, पोलीसांनी मिळवलेल्या माहितीनुसार या सगळ्यांना खऱ्या लसीऐवजी सलाईनचे पाणी दिले गेल्याची माहिती पालिकेच्या वकीलांनी न्यायालयाला सादर केली. या सर्व नागरिकांची कोविन पोर्टलवर झालेली नोंदणी रद्द करावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली असल्याची माहितीही त्यांनी उच्च न्यायालयाला दिली.